‘AI’लाच बनवलं हत्येचं शस्त्र! 50 लाखांसाठी मुलीनेच संपवलं स्वतःचं कुटुंब; थरकाप उडवणारी घटना…

बंगळुरू : बंगळुरूमधील केआर पुरम परिसरातील साई ग्रीन होम अपार्टमेंटमध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात 24 वर्षीय श्वेता आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर 25 वर्षीय केनेथ यांना अटक करण्यात आली असून, श्वेतानेच स्वतःच्या आई-वडिलांसह लहान बहिणीचा जीव घेतल्याचा आरोप आहे. या गुन्ह्याला आणखी धक्कादायक बनवणारी बाब म्हणजे संपूर्ण कट रचताना आणि पुरावे नष्ट करण्याचे मार्ग शोधताना दोघांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ची मदत घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, श्वेताने नोकरी गेल्यानंतर आई मुथुलक्ष्मी यांच्याकडून 50 लाख रुपये उसने घेतले होते. हे पैसे प्रामुख्याने केनेथवर खर्च झाल्याचे समोर आले. भविष्यात आई पैसे परत मागेल, तसेच कुटुंब त्यांच्या नात्याला विरोध करेल, या भीतीतून दोघांनी तब्बल सहा महिन्यांपूर्वीच हत्येचा कट रचल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

या काळात आरोपींनी AI टूलवर हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल कशी करावी, रक्ताचे डाग कसे हटवावेत, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, हल्ल्यानंतर संशय टाळण्यासाठी कोणत्या खबरदारी घ्याव्यात, तसेच क्लाउड किचनसाठी वापरल्या जाणाऱ्या भट्टीत मृतदेह जाळल्यास पुरावे नष्ट होतील का, अशा अनेक प्रश्नांची माहिती घेतली. तपासात केनेथने AI मधून मिळालेल्या माहितीनुसार स्वतःच्या फ्लॅटमध्ये लोखंडी भट्टी तयार केल्याचाही दावा करण्यात आला आहे.


22 जून रोजी श्वेताने आधी आई मुथुलक्ष्मी यांना फ्लॅटवर बोलावले. दार उघडताच दोघांनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर वडील सोमा सुंदर आणि धाकटी बहिण सुप्रिया यांनाही वेगवेगळ्या कारणांनी फ्लॅटमध्ये बोलावून त्यांच्यावरही जीवघेणा हल्ला करण्यात आला. तिघेही मृत झाल्याचा समज करून आरोपींनी फ्लॅट बंद केला. त्यानंतर श्वेताच्या आईच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन दोघे पुद्दुचेरीच्या दिशेने पसार झाले.
मात्र, गंभीर जखमी असलेले सोमा सुंदर मृत्यूशी झुंज देत घराबाहेर आले. शेजाऱ्यांनी त्यांना पाहताच पोलिसांना माहिती दिली. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी पत्नी आणि मुलीवर हल्ला करणारे आरोपी म्हणजे स्वतःची मुलगी श्वेता आणि तिचा मित्र केनेथ असल्याचा जबाब दिला. काही वेळानंतर त्यांचाही मृत्यू झाला.
या जबाबाच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवत पुद्दुचेरीतून श्वेताला ताब्यात घेतले. त्यानंतर एका बारमध्ये लपलेल्या केनेथलाही अटक करण्यात आली. चौकशीत श्वेताने आईने आयुष्यभर स्वतःवर बंधने घातली, स्वातंत्र्य दिले नाही आणि सतत नियंत्रण ठेवले, त्यामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
दोघांचे लॅपटॉप आणि डिजिटल उपकरणांची तपासणी करताना AI शी झालेले संवाद, विचारलेले प्रश्न आणि मिळालेली उत्तरे पोलिसांच्या हाती लागल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे AI च्या गैरवापराबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, भारतीय कायद्यानुसार AI ला गुन्हेगारी हेतू असलेली स्वतंत्र कायदेशीर व्यक्ती मानले जात नसल्याने त्याच्यावर कारवाई शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणात आरोपींनी तंत्रज्ञानाचा कसा गैरवापर केला, यावरच तपासाचा मुख्य भर असून AI मधील माहिती महत्त्वाचा डिजिटल पुरावा ठरत आहे.