मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट ; दोरी बांधताना तोल गेल्यामुळे गोविंदाचा जागीच मृत्यू..

मुंबई : राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना मुंबईच्या मानखूर्दमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहीहंडी उत्सवात दोरी बांधताना बाल गोविंदा पथकातील गोविंदाचा तोल गेला आणि तो खाली पडला. उंचावरून खाली पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे दहीहंडी उत्सवाला गालबोट लागल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगमोहन शिवकिरण चौधरी (वय वर्ष ३२) असे मृत गोविंदाचे नाव आहे. हा तरूण दहीहंडीसाठी दोरी बांधत होता. यादरम्यान, त्याचा तोल गेला. तो थेट खाली कोसळला.उंचावरून खाली कोसळल्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. गंभीर जखमी अवस्थेत रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर चौधरी कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान दहीहंडी उत्सवात आतापर्यंत एकूण ३० गोविंदा जखमी झाले असल्याची माहिती विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांकडून मिळाली आहे. त्यापैकी १५ जणांवर उपचार सुरू असून, १५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सायन रुग्णालयात १८, केईएममध्ये ६ तर नायरमध्ये ६ गोंविदा दाखल झाले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.