Crime News : मोबाईलवरून मैत्री, त्यानंतर भेटायचा प्लान, अन्…; पालघरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत घडलं भयंकर, दोघांना अटक
Crime News : राज्यात अलीकडे महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका १५ वर्षीय मुलीवर एकदा नाहीतर अनेकदा सामुहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात ही घटना घडली असून संपूर्ण महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, आरोपींपैकी एका मुलाने पीडितेशी इंस्टाग्रामवर मैत्री केली होती. दोघांमध्ये मैत्री वाढली आणि त्यानंतर दोघांनी भेटायचे ठरवले. ३० एप्रिल रोजी तरुणानं तिला आपल्या घरी नेलं आणि तिथे त्यानं मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा ४ मे रोजी आरोपीनंने आणखी एका तरुणासोबत पीडितेवर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार बलात्कार केला. Crime News
अत्याचार झाल्यानंतर मुलगी घरी पोहोचली, त्यावेळी तिची अवस्था पाहून कुटुंबियांना धक्काच बसला. कुटुंबियांनी विश्वासात घेऊन मुलीची विचारपूस केल्यावर पीडितेने घटलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबियांनी तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेतली.
पीडितेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पालघर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला. आणि त्यानंतर सोमवारी दोन्ही आरोपींना तलासरी येथे धाड टाकून अटक केली.