Crime News : माता न तू वैरिणी! मुलाला ठार करून बॅगेत मृतदेह भरला अन्…: CEO महिलेच्या कृत्याने उडाली खळबळ
Crime News : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे हे प्रशासनापुढे एक मोठे आव्हान बनले आहे. सध्या असेच एक धक्कादायक घटना घडल्याची समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरले आहे.
बेंगळुरू येथील एका टेक कंपनीच्या सीईओ महिलेने पोटच्या चार वर्षाच्या मुलाचा सिकेरी, कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये निर्दयपणे खून केला. मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन महिला टॅक्सीने बेंगळुरूच्या दिशेने जात असताना तिला चित्रदुर्ग येथे पोलिसांनी अटक केली.एका उच्चशिक्षित महिलेने केलेल्या या निर्दयी कृत्यामुळे गोवा आणि कर्नाटक ही दोन्ही राज्ये हादरून गेली आहेत. Crime News
सुचना सेठ (वय.३९) असे या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ही महिला उच्च शिक्षित आणि एका एआय कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहे. सुचना सेठने शनिवारी सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये आपल्या चार वर्षीय मुलासह चेक इन केले. पण सोमवारी तिने हॉटेलमधून एकटीनेच चेकआऊट केले.
तिच्या हातात बॅग होती. पण तिचा मुलगा नव्हता. तिने हॉटेलच्या रिसेप्शनला टॅक्सी बुक करण्यास सांगितले. टॅक्सी भाडे महाग पडेल त्यामुळे विमानाने प्रवास करण्याची महिलेला विनंती केली असता तिने टॅक्सीच बुक करण्याचा आग्रह रिसेप्शनकडे धरला. त्यानंतर ही महिला टॅक्सीने बेंगळुरूच्या दिशेने रवाना झाली.
सदर महिला राहत असणाऱ्या रुममध्ये रक्ताचे डाग रुमबॉयला सापडले होते. त्याने तातडीने हॉटेलमधील वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यांनी याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक चौकशी करून टॅक्सी चालकाला संपर्क करून महिलेशी संपर्क साधला.
या महिलेला मुलाबद्दल विचारले असता तिची उत्तरं पोलिसांनी संशयास्पद वाटली. त्यामुळे पोलिसांनी चालकाला टॅक्सी जवळच्या पोलीस स्थानकात नेण्यास सांगितली. तिथे तिची झडती घेतली असता मुलाचा मृतदेह बॅगेत सापडला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.