कोरोनाचा पुन्हा हाहाकार! एकाच महिन्यात तब्बल 79 हजार रुग्ण; भारतातही वाढली धाकधूक?


नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. जून महिन्यात मोठ्या प्रमाणावर नव्या रुग्णांची नोंद झाल्याने तेथील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळत असली तरी संसर्गाचा वाढता वेग लक्षात घेता शेजारील देशांसह भारतही परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे.

जूनमध्ये 79 हजार नवे रुग्ण

चीनच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जून महिन्यात देशभरात सुमारे 79 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्यापैकी 130 रुग्णांची प्रकृती गंभीर होती, तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी वाढत्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणेने देखरेख वाढवली आहे.

NB.1.8.1 व्हेरियंटचा वाढता प्रभाव

चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या आकडेवारीनुसार, सध्या ओमिक्रॉनचा NB.1.8.1 हा व्हेरियंट वेगाने पसरत आहे. 13 ते 19 जुलैदरम्यान कोरोना चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर 16.3 टक्क्यांवर पोहोचला, जो त्याआधीच्या आठवड्यात सुमारे 12 टक्के होता. दुसरीकडे, इन्फ्लूएंझाचा पॉझिटिव्हिटी दर 12.6 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

संक्रमितांमध्ये ताप, घशात खवखव, सर्दी, पडसे आणि अंगदुखी यांसारखी सौम्य लक्षणे दिसत असून, बहुतांश रुग्ण 5 ते 7 दिवसांत पूर्णपणे बरे होत असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भारतासाठी किती धोकादायक?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात एअर कंडिशनर असलेल्या बंद जागांमध्ये अधिक वेळ घालवल्यामुळे विषाणूचा प्रसार वाढण्यास अनुकूल वातावरण तयार होते. मात्र, सध्या आढळणारा NB.1.8.1 व्हेरियंट पूर्वीच्या कोरोना प्रकारांइतका गंभीर नसल्याचे निरीक्षण आहे. संसर्ग वाढत असला तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या किंवा मृत्यूदरात लक्षणीय वाढ झालेली नाही.

सध्या भारतात या व्हेरियंटमुळे कोणतीही असामान्य परिस्थिती निर्माण झालेली नाही. तरीही आरोग्य तज्ज्ञांनी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले, कमी प्रतिकारशक्ती असलेले नागरिक आणि गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!