दौंड – पुणे – दौंड दरम्यान उपनगरीय ई. एम. यू लोकल सेवा सुरु करा, प्रवाशांची आग्रही मागणी…

दौंड : पुणे दौंड दरम्यान शेकडो प्रवासी नियमित प्रवास करतात. पण या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. या दोन स्थानकांदरम्यान धावणाऱ्या ‘डेमू आणि मेमू’ चा प्रवास अनेकदा रेंगाळतो. त्यामुळे प्रवाशांना पुण्यातील आपले कामाचे ठिकाण गाठण्यास बराच उशीर होतो.
या गोष्टी अलिकडच्या काळात सतत होत आहेत. त्यामुळे अनेकांना नोकऱ्या गमावाव्या लागल्याची उदाहरणे आहेत. हा प्रवास प्रवाशांसाठी अधिक सोयीचा व वक्तशीर व्हावा, यासाठी दोन्ही स्थानकांदरम्यान लोणावळा – पुणे – लोणावळा उपनगरीय ई.एम.यू लोकल सेवेप्रमाणेच दौंड – पुणे – दौंड दरम्यान देखील उपनगरीय ई.एम.यू लोकल सेवा सुरु करणे आवश्यक आहे.
ही नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांची मागणी असून त्यांच्या मागण्यांचा रेल्वे खात्याने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील गेल्या काही दिवसांपासून आवाज उठवला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी रेल्वेमंत्री मा. आश्विनी जी वैष्णव यांना नम्र विनंती आहे, की कृपया आपण दोन्ही स्थानकांदरम्यान उपनगरीय ई.एम.यू लोकल सेवा सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्या. याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.