बंदिस्त मुठा कालवा होणार सहापदरी मार्ग ! खडकवासला ते फुरसुंगी बंदिस्तकालव्यावरून वाहतुक कोंडी सोडविणार ……

पुणे : सध्या पुण्यात सर्वात जास्त वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. असे असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंतच्या 34 किलोमीटर लांबीच्या मुठा उजवा कालव्याच्या जागेवर सहापदरी रस्ता उभारण्याचा निर्णय झाला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची गरज लक्षात घेऊन या रस्त्याबरोबरच मेट्रो मार्गिकाही उभारली जाणार आहे. यामुळे याबाबत दिलासा मिळणार आहे.
या निर्णयामुळे मुठा उजवा कालव्याच्या मोकळ्या जागेवर बिल्डर आणि व्यापारी गटांकडून होणाऱ्या अतिक्रमणाला आळा बसेल. तसेच, कालव्याच्या आजूबाजूला झालेली आणि नव्याने होत असलेली अतिक्रमणे कोणत्याही स्थितीत हटवण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे अनेक अर्थाने हा मार्ग सोयीचा असणार आहे.
सध्या हा प्रकल्प वन विभाग आणि पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे. भूमिगत कालवा झाल्यानंतर मुठा उजवा कालव्याची जागा वाहतुकीसाठी मोकळी होईल. याबाबत काही बिल्डरांनी ही जागा मिळवण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
असे असताना शासनाने ही जागा सार्वजनिक वाहतुकीसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यावर सहापदरी रस्ता उभारण्याचे स्पष्ट केले आहे. खडकवासला ते फुरसुंगी या 34 किलोमीटर लांबीच्या कालव्याच्या जागेची सुमारे 20 हजार कोटी रुपये किंमत असल्याचा अंदाज आहे. पुणे शहराच्या दृष्टीने हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे.