बारावीच्या विद्यार्थीनीला फुस लावून पळवले, एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल, लोणी काळभोर येथील घटना…

लोणी काळभोर : याठिकाणी बारावीच्या विद्यार्थिनीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत एकाच्या विरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या चुलत्यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओम सुरेश काळभोर (वय-20, रा. लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी यांचे वय 49 असून ते लोणी काळभोर परिसरात राहतात. फिर्यादी हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.
त्यांना 17 वर्षाची पुतणी असून ती लोणी काळभोर परिसरात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी ओम काळभोर हा अल्पवयीन मुलीच्या घरी आला. आरोपीने तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन आमिष दाखविले. त्यानंतर त्याच्यासोबत चारचाकी गाडीतून घेऊन गेला. नंतर आरोपीने अल्पवयीन पुतणीचे अपहरण केल्याची तक्रार फिर्यादी यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दिली आहे.

दरम्यान, याबाबत तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पूजा माळी करत आहेत. आरोपी ओम काळभोर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी हा फरार झाला आहे. पोलिसांचे एक पथक आरोपीचा शोध आहे.