केंद्रीय मंत्री मंडळाचा मोठा निर्णय! ७० वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांना मिळणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ…
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत वृद्धांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता ७० वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्मान आरोग्य योजनेअंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे १२.३ कोटी कुटुंबांना फायदा होणार असून, ६.५ कोटी वृद्ध नागरिक या योजनेचा थेट फायदा घेणार आहेत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वर्षाला ५ लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ही एक नवीन श्रेणी असेल. या अंतर्गत सरकार ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधेसह आरोग्य विमा देणार आहे.
आता या योजनेअंतर्गत कार्ड बनविण्यात येणार असून, ७० वर्षे आणि त्यावरील वयोवृद्धांना या कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा ज्येष्ठांनाही लाभ घेता येणार आहे. आरोग्यदायी समाजासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातच यासंबंधीची माहिती दिली होती. त्यानुसार आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला असून, आता ज्येष्ठांना आयुष्मान भारतचे कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.