मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी, अधिकारी पहिल्या दिवशी शाळेत, काय आहे शिक्षण विभागाचा नवा उपक्रम?, जाणून घ्या..

पुणे : शालेय शिक्षण विभागाने शंभर शाळांना भेट देणे हा उपक्रम जाहीर केला असून, शाळांना भेट देणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल वाढण्यासाठी उपाययोजना सुचवण्याची सूचना केली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्यासह अधिकारीवर्ग आता शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी किमान एका शाळेला भेट देणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
समाज, पालक यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणे, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शंभर शाळा भेटींचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६च्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी, सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेला भेट द्यावी.
लोकप्रतिनिधी, शालेय शिक्षण विभागातील अधिकार्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा भेटीत शाळांतील कामकाज, शैक्षणिक गुणवत्ता, इतर सोयीसुविधांचा आढावा घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे मूल्यमापन करावे.
दरम्यान, भौतिक सुविधेचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या खेळाच्या सुविधेचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, पाण्याअभावी बंद असलेली शौचालये अशा मूलभूत समस्या आढळल्यास संबंधित यंत्रणेस तत्काळ पावले उचलण्याच्या सूचना द्याव्यात, असे नमूद करण्यात आले आहे.