छत्रपतीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार!! उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्षेत्रात ठाण मांडून, निकालाकडे राज्याचे लक्ष…

ओंकार निंबाळकर, बारामती : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. यामुळे सर्व उमेदवार आज सर्व मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन सभा झाल्यानंतर आज देखील त्यांच्या दोन सभा होणार आहेत. आज सांगता सभा सणसर याठिकाणी होणार आहे.
यामुळे या निकालाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले असून अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अजित पवार छत्रपतीच्या कार्यक्षेत्रात ठाण मांडून असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सुरुवातीला बिनविरोध होईल असे सांगितले जात असताना दोन पॅनल झाले. यामध्ये छत्रपती बचाव पॅनलच्या अनेक उमेदवारांनी श्री भवानीमाता पॅनलला पाठिंबा दिला.
यामुळे छत्रपती बचाव पॅनलला उमेदवार कमी पडले. असे असताना देखील निवडणुकीत रंगत वाढली आहे. छत्रपती बचाव पॅनलकडून अविनाश घोलप, मुरलीधर निंबाळकर, तानाजी थोरात यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. तसेच भवानीमाता पॅनलकडून अजित पवार, दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक यांनी प्रचार केला.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून रविवारी मतदान आणि सोमवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात या करखान्यापासून झाल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची आहे. सध्या कारखाना अडचणीत आला आहे. आपणच लक्ष न दिल्याने कर्ज वाढत गेल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
यामुळे आता जुन्या सर्व संचालकांना तिकीट न देता त्यांनी नवीन लोकांना संधी दिली आहे. यामुळे आता पृथ्वीराज जाचक यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच 10 वर्षे निवडणूक का लांबवली? असा प्रश्न विचारत विरोधक टीका करत आहेत. यामुळे वातावरण तापले आहे. यामुळे सभासद नेमकं कोणाला कौल देणार हे येत्या तीन दिवसांतच समजणार आहे.