चंद्रकांतदादा एक गुंड पळून परदेशात गेला तेव्हा तुम्ही पोलिसांना फोन केला नाही, पण गौतमी पाटीलसाठी लगेच…

पुणे : अहिल्यानगरचा खोटा पत्ता देऊन गुंड निलेश घायवळ हा परदेशात पळून गेल्याचे नुकतेच समोर आले आहे. यामुळे पोलीस यंत्रणेवर टीका केली जात आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, चंद्रकांतदादा तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही.
गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे.

पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही. आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे.
महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल. पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात? असेही आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.