नवरात्रीत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 25 लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन….

पुणे : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने देशभरातील महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत 25 लाख नवीन मोफत गॅस कनेक्शन महिलांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी सोमवारी ही घोषणा केली आहे. या अंतर्गत सरकार प्रत्येक कनेक्शनवर 2050 रुपयांचा खर्च करणार आहे. या निर्णयामुळे पीएम उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 106 दशलक्ष होणार आहे.

मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर आत्तापर्यंत महिलांसाठी अनेक निर्णय घेतलेत. पीएम उज्वला, लखपती दीदी, पीएम मातृत्व वंदना अशा असंख्य योजना सरकारकडून सुरू करण्यात आल्या आहेत.आता यातीलच प्रधानमंत्री उज्वला योजनेतून महिलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.या योजनेच्या माध्यमातून आणखी 25 लाख मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या निर्णयामुळे महिला सक्षमीकरणास चालना मिळणार आहे.

पीएम उज्वला योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना एक एलपीजी सिलेंडर, गॅस स्टोव्ह, रेग्युलेटर आणि इतर संबंधित उपकरणे मोफत दिले जाणार आहेत. देशभरातील लाखो महिलांसाठी ही नवरात्र उत्सवाची एक खास भेट ठरणार आहे. पीएम उज्वला योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास महिलांना आधार कार्ड, रेशन कार्ड, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खाते द्यावे लागणार आहे.ज्या महिलांच्या नावावर आधीच गॅस कनेक्शन आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही. आधीच पीएम उज्वला योजनेचा लाभ घेतलेला महिलांना देखील याचा लाभ मिळणार नाही. https://pmuy.gov.in/e-kyc.html या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक महिलांना अर्ज सादर करता येणार आहे.

