अनधिकृत बांधकाम केलेप्रकरणी उद्योजकावर गुन्हा दाखल; पूर्व हवेलीतील इतर अनेक बांधकामांवर कारवाई होणार का?


लोणी काळभोर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वारंवार नोटीस बजावूनही अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवल्याप्रकरणी एका विकासकाविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन व निष्कासन विभागातील शाखा अभियंता (कंत्राटी) प्रणव दिलीप डेंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उद्योजक हेमंत हाडके (रा. लोणी काळभोर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु पूर्व हवेलीत शेकडो अनधिकृत बांधकामे आणि मोठे प्रकल्प सुरू असल्याची चर्चा असून, त्या विकासकांवरही पीएमआरडीए कारवाई करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती येथील गट क्रमांक ४७७ मधील बांधकामाबाबत अशोक दिनकर खोले यांनी पीएमआरडीएकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने २७ मार्च २०२६ रोजी अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी केली असता संबंधित ठिकाणी हाडके यांच्या मालकीचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून त्यांना ६ एप्रिल २०२६ रोजी बांधकाम तात्काळ थांबविण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

परवानगी प्राप्त होईपर्यंत कोणतेही पुढील बांधकाम करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. आदेशाचे पालन न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला होता. परंतु हाडके यांनी आवश्यक कागदपत्रे सादर न करता नोटीस आणि सुनावणी प्रक्रिया सुरू असतानाही बांधकाम सुरूच ठेवल्याचे पीएमआरडीएच्या निदर्शनास आले. त्यामुळे

पीएमआरडीएचे पदनिर्देशित अधिकारी तथा तहसीलदार रविंद्र रांजणे यांच्या आदेशानुसार संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. २७ मार्च ते २ जून २०२६ या कालावधीत आदेशाचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम सुरू ठेवल्याचा ठपका ठेवत हेमंत हाडके यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदमवाकवस्तीसह पूर्व हवेली परिसरात वाढत्या अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

नोटीस बजावल्यानंतरही बांधकाम सुरू ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिल्याने अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र एका विकासकावर कारवाई झाल्यानंतर आता पूर्व हवेलीतील इतर कथित अनधिकृत प्रकल्पांवरही अशीच कठोर कारवाई होणार का? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!