कदमवाकवस्तीतील चिमुकल्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी अखेर ठेकेदारावर गुन्हा; निष्काळजीपणामुळे गमावला दोन वर्षांच्या बालकाचा जीव!


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील इंदिरानगर परिसरात घरासमोर खोदलेल्या आणि पावसाच्या पाण्याने भरलेल्या चारीत पडून दोन वर्षीय सोहम कसबे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याप्रकरणी अखेर संबंधित ठेकेदाराविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, निष्काळजीपणामुळे एका निष्पाप बालकाचा जीव गेल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

याप्रकरणी सोहमची आई शिल्पा लखन कसबे (वय २३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अंबाबाई मंदिराजवळील इंदिरानगर परिसरात सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सुमारे आठ दिवसांपूर्वी जेसीबीच्या सहाय्याने मोठा चर खोदण्यात आला होता. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली नव्हती. तसेच संरक्षक कठडे, इशारा फलक किंवा पाणी साचू नये यासाठी आवश्यक उपाययोजनाही करण्यात आल्या नव्हत्या.

या निष्काळजीपणामुळे तीन ते चार फूट खोल आणि सुमारे पाच फूट रुंद खड्ड्यात पावसाचे व सांडपाणी साचले होते. ३० जून रोजी सकाळी घरासमोर खेळत असताना सोहम अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी शोध घेतला असता चरीजवळ त्याची चप्पल आढळून आली. त्यानंतर नातेवाईकांनी पाण्यात शोध घेतला असता सोहम बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला तातडीने विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

संबंधित ठेकेदाराने सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करता चर खुला ठेवला आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. अखेर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!