तेलंगणच्या बीआरएसचे पुणे जिल्ह्यात प्रस्थ वाढले! दौंडमध्ये भाजप, राष्ट्रवादीचे नाराज दिग्गज ‘त्या’ वाटेवर..

दौंड : सध्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती या पक्षाने दौंड शहरासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना भुरळ घातली आहे.

तालुक्यात तेलंगणाच्या या पक्षाविषयी दिवसेंदिवस पसंती वाढत चालली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील पक्षात नाराज असलेले नेते या पक्षात प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
आगामी लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी याने वाढली आहे. भारत राष्ट्र समितीचा ‘तेलगंणा पॅटर्न’ आता महाराष्ट्रात राबवून सत्ता आणण्यासाठी बीआरएस पक्षाचे अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कंबर कसली आहे.

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकी महाराष्ट्रात उतरण्याची बीआरएसची तयारी सुरु असताना बीआरएसने आता महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील सावखेडा ग्रामपंचायतीवर (ता.गंगापूर) बीआरएसने झेंडा फडकावला आहे.
तर तेलंगण राज्यातील शेतीविषयीचे धोरण, मोफत वीज तसेच अनेक मुलभूत सोयी सुविधा सर्वसामान्यांसाठी यशस्वी उपाययोजना राबवल्याने शेतकऱ्यांची ही पसंती या पक्षाला मिळू लागली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांची विचारधारा जोपासणारा पुरोगामी पक्ष म्हणून याची महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर बीआरएस पक्षात अनेक पक्षातील नेते व कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. या पक्षाची सध्या दौंड तालुक्यातही जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोण नेते पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.