बृजभूषण शरण सिंह यांना लैंगिक छळ केल्याच्या आरोप प्रकरणी जामीन मंजूर…
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होते
बृजभूषण सिंह यांना राऊज अव्हेन्यू न्यायालयात १८ जुलै रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. त्यानुसार आज बृजभूषण सिंह न्यायालयात हजर झाले होते. सिंह यांच्याबरोबर कुस्ती संघटनेचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनाही हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.
बृजभूषण सिंह यांच्याविरोधात ६ महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पोलिसांनी सिंह यांच्याविरोधात दोषारोप पत्र दाखल केलेले आहे. त्याची दखल घेत राऊज अव्हेन्यू न्यायालयाने सिंह व तोमर यांच्याविरोधात समन्स बजावले होते.
सिंह यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३५४ ए आणि ३५४ डी अंतर्गत गुन्हे दाखल आहेत तर तोमर यांच्याविरोधात कलम १०९, ३५४, ३५४ ए, ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, महिला कुस्तीपटूंना न्याय दिला जावा, अशी मागणी करीत जंतर मंतरवर कुस्तीपटूंनी तीव्र आंदोलन केले होते. त्यानंतर १५ जून रोजी पोलिसांनी सिंह यांच्याविरोधात १५०० पानांचे दोषारोप पत्र दाखल केले होते. गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने पोलिसांकडून सीडीआर अहवाल मागविला होता.