मोठी बातमी! ऋषिकेशमध्ये उज्जयनी एक्सप्रेसचा भीषण अपघात, तीन डबे रुळावरून घसरले…


उत्तराखंड : उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे सोमवारी रात्री मोठा रेल्वे अपघात घडला. योगनगरी ऋषिकेश रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये उज्जयनी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्याने एकच खळबळ उडाली.

या अपघातात एक डबा पूर्णपणे उलटून सुमारे 20 फूट उंचीवर रुळांवर लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची भीषण दृश्ये आता समोर आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 9.23 वाजण्याच्या सुमारास स्थानक परिसरात ट्रॅक बदलण्याचे आणि देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याचवेळी उज्जयनी एक्सप्रेसचे डबे अचानक रुळावरून घसरले. सुदैवाने ट्रेन रिकामी असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये केवळ लोको पायलट उपस्थित होता.

प्राथमिक तपासात ट्रेनचे ब्रेक निकामी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही ट्रेन मंगळवारी सकाळी सुटणार होती. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. जीआरपी जवानांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात घेत परिसर रिकामा केला.

दरम्यान, वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचा आरोपही केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, रुळांवरून घसरलेले आणि खराब झालेले डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!