पुण्यात भाजपचा शरद पवारांना धक्का ; शेकडो कार्यकर्त्यांचां राष्ट्रवादीला रामराम….

पुणे : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला चांगलीच गळती लागली आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या वाटेवर जात आहेत.. अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पुण्यात भाजपने शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे. भोर आणि मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठ खिंडार पडल आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग ओझरकर, सुखदेव तापकीर, सुरेश हुलावळे, अमित कंधारे, पांडुरंग राक्षे, मोरेश्वर घारे यांचा समावेश आहे. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले.यावेळी चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्यात विकासाचे पर्व सुरू आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राप्रमाणे सर्वदूर विकासात्मक कामे गतीने सुरू आहेत. आज या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने भाजपा मध्ये प्रवेश केलाय त्या विश्वासास पात्र ठरण्याचा प्रयत्न आम्ही करू.
दरम्यान यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार संग्राम थोपटे, आ. प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते. भोर मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रवेश झाले. त्यांच्या या पक्षप्रवेशाने पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.