पुणेकरांसाठी सर्वांत मोठी बातमी! मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, कसा असणार मार्ग?


पुणे : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या विस्तारासाठी केंद्र सरकारकडून ३६०० कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.

तसेच दुसऱ्या टप्प्यात वनाज ते चांदणी चौक (मार्ग 2A) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (मार्ग 2B) या दोन उन्नत मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. हे मार्ग आधीच्या वनाज–रामवाडी (फेज-1) मेट्रो मार्गाचा विस्तार असणार आहेत.

हे दोन्ही कॉरिडॉर मिळून 12.75 किलोमीटर लांबीचे असतील आणि त्यात 13 स्थानके असतील. या विस्तारांमुळे पुणे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच वेगाने विकसित होणारे चांदणी चौक, बाणेर, कोथरूड, खराडी आणि वाघोली हे उपनगर मेट्रोने पुण्याशी जोडले जातील.

हा प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.अंदाजित खर्च: ३,६२६.२४ कोटी (भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचा समान वाटा) प्रकल्प पूर्णत्व कालावधी हा ४ वर्षे असणार आहे.

या मार्गांमुळे चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोलीसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांना थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. प्रकल्पाचा उद्देश म्हणजे पुण्यातील पूर्व-पश्चिम दिशेतील सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे.

हे मार्ग लाइन-1 (निगडी–कात्रज) आणि लाइन-3 (हिंजवडी–डिस्ट्रिक्ट कोर्ट) या मेट्रो मार्गांशी “डिस्ट्रिक्ट कोर्ट इंटरचेंज” स्थानकावर जोडले जाणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना सुलभ आणि एकात्मिक प्रवास अनुभवता येणार आहे. याचसोबत, मुंबई, बेंगळुरू, अहिल्यानगर, आणि संभाजीनगर येथून येणाऱ्या आंतरशहरी बस सेवा देखील या मेट्रो स्थानकांशी जोडल्या जाणार आहेत.

दरम्यान, २०२७ पर्यंत या विस्तारामुळे रोजच्या प्रवाशांची संख्या जवळपास ९६ हजार पर्यंत वाढेल, आणि २०५७ पर्यंत ती ३.५ लाखांहून अधिक होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या विस्तारामुळे पुण्याची वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, गतिमान आणि पर्यावरणपूरक होणार असून, आर्थिक आणि शहरी विकासालाही चालना मिळेल.

लांब पल्ल्याच्या वाहतूक नियोजनानुसार, मुंबई आणि बंगळूरुसारख्या शहरांमधून येणाऱ्या आंतरशहर बस सेवा चांदणी चौकात मेट्रोशी जोडल्या जातील, तर अहिल्या नगर (अहमदनगर) आणि छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) कडून येणाऱ्या बस सेवा वाघोली येथे मेट्रोशी जोडल्या जातील. यामुळे प्रवाशांना पुणे मेट्रो प्रणालीत सहज प्रवेश मिळेल. या विस्तारांमुळे पौड रोड आणि नगर रोडसारख्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सुरक्षित, जलद व पर्यावरणपूरक प्रवासाचे पर्याय उपलब्ध होतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!