खासदार संजय राऊतांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट ; कधी मिळणार डिस्चार्ज?

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली होती.आता संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संजय राऊतांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्यावर सध्या मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख आणि सक्रिय नेते आहेत, त्यांच्या आरोग्याविषयीच्या या बातमीने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. फोर्टीस रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना लवकरच घरी पाठवले जाईल. वैद्यकीय पथक त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवून होते आणि योग्य उपचार पद्धतीमुळे ते लवकर बरे झाले आहेत. मात्र डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान ऐन मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत हे राजकारणापासून दूर राहणार आहेत. यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चिंतेत पडले आहेत. असे असले तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने ठाकरें गटाच्या कार्यकर्त्यां आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण देखील आहे.
