मराठा समाजात मोठी फूट, मराठा क्रांती मोर्चाचा कुणबी प्रमाणपत्रावर मोठा आक्षेप, मनोज जरांगे पाटील यांना थेट चॅलेंज..

मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात विविध घडामोडी सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण केले होते. यानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटियरनुसार जात प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली आहे.

त्यानंतर आता मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असताना दुसरीकडे मात्र मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण देण्यास मराठा क्रांती मोर्चाने तीव्र विरोध दर्शवला आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच मराठा म्हणून आरक्षण मिळावे, अशी ठाम भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी आरोप केला की काही राजकीय नेते आणि समाजातील काही व्यक्ती जाणूनबुजून समाजात संभ्रम निर्माण करत आहेत. सुनील नागणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ज्यांच्याकडे जुनी नोंद “कुणबी” अशी आहे त्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळावं यात कोणताही वाद नाही.

मात्र, ज्यांच्या नोंदींमध्ये स्पष्टपणे “मराठा” असा उल्लेख आहे, त्यांना आरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. हे अन्यायकारक असल्याचं ते म्हणाले. त्यांनी ठाम भूमिका घेतली की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं तर ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही.
मराठा क्रांती मोर्चाने सांगितलं की, अनेक पिढ्यांपासून समाजाची ओळख “मराठा” अशीच राहिली आहे. त्यामुळे आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच मराठा म्हणून आरक्षण हवं, अन्यथा समाजावर मोठा अन्याय होईल. नागणे यांनी स्पष्ट केलं की सरकारने जारी केलेला जीआर फक्त कुणबी नोंद असलेल्यांसाठीच उपयुक्त आहे, बाकी समाज वंचित राहील.
मराठा क्रांती मोर्चाच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षण आंदोलनात दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. एकीकडे जरांगे पाटील यांचे समर्थक कुणबी प्रमाणपत्रावर भर देत आहेत, तर दुसरीकडे क्रांती मोर्चा “मराठा” या स्वतंत्र ओळखीवर ठाम आहे. त्यामुळे सरकारसमोर तोडगा काढण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.