मोठी बातमी! शिवसेना ठाकरें गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार?

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांचीही तोफ धडाडणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.याच मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची जाहीर घोषणा होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, राज ठाकरे हे दसरा मेळाव्यात नसल्याने युतीची घोषणा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्काच बसला आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी आता आगामी मुंबई महापालिका आणि इतर महापालिकांची निवडणूक महत्त्वाची आहे. तर, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रस्त्यावरील आंदोलने सुरू असली निवडणुकीतील मोठं यश मिळत नाही. अशातच ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू एकत्र येतील का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी याआधीच भूमिका स्पष्ट केली होती. शिवसेना आणि मनसे दोन राजकीय पक्ष असून त्यांचे काही मेळावे महत्त्वाचे आहेत. शिवसेनेसाठी दसरा मेळावा महत्त्वाचा असतो. तर, मनसेसाठी गुढी पाडवा मेळावा महत्त्वाचे असल्याचे वक्तव्य केले होते.
