मोठी बातमी! मनसेतून बडतर्फ झालेल्या वैभव खेडेकरांना पुन्हा झटका ; भाजप पक्षप्रवेश दुसऱ्यांदा वेटिंगवर

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.कोकणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वैभव खेडेकर यांना काही दिवसांपूर्वी मनसेने पक्षातून बडतर्फ केले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याच्या पक्षप्रवेशाची जय्यत तयारी देखील सुरू करण्यात आली होती मात्र त्यांचा भाजप पक्षप्रवेश पुन्हा लांबणीवर पडला असल्याची माहिती समोर आली आहे.

वैभव खेडकर आपल्याला शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेशाची तयारी करत असतानाच मराठा आंदोलनामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आली आहे. त्यानंतर काल तर वैभव खेडेकर जाहिरातबाजी बॅनरबाजी करत कोकणातून थेट मुंबईत भाजप प्रदेशकार्यालयात पक्ष प्रवेशसाठी दाखल ही झाले होते. गाड्यांच्या ताफ्यासह खेडेकर आले पण भाजप प्रवेशाची गाडी तिसऱ्यांदा अडली, या गाडीला भाजप हिरवा कंदील कधी दाखविणार? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते वैभव खेडेकर यांचा भाजपातील पक्षप्रवेश एकदा लांबणीवर पडल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या पक्षप्रवेशाकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्याने रत्नागिरी जिल्ह्यात खेडेकर यांचा भाजपातील पक्षप्रवेश चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
