मोठी बातमी! शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार ; आर. आर. आबांच्या लेकाला मिळणार मोठी जबाबदारी?

पुणे : काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षनेतृत्वात बदल केला होता. प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची वर्णी लावली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार पक्षात भाकरी फिरवण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आता आर.आर.पाटील यांचे पुत्र आणि तासगाव कवठे महांकाळचे आमदार रोहित पाटील यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पक्षांतर्गत फेरबदल करणार असल्याची माहिती आहे. यात रोहित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) युवक प्रदेशाध्यक्ष ही नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सध्या युवक अध्यक्ष असलेले मेहबूब शेख यांच्याकडे बऱ्याच कालावधीपासून हे पद राहिलं आहे. त्यामुळे शरद पवार आता भाकरी फिरवण्याची शक्यता असून पक्षांतर्गत फेरबदल होताना रोहित पाटील यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. ते अजित पवारांसोबत महायुती सरकारमध्ये सामील झाले. यामुळे शरद पवार गटात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली . याच पार्श्वभूमीवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शरद पवार रोहित पाटील यांच्याकडे युवक अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.