मोठी बातमी! जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर ‘या बड्या पक्षाची ऑफर

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री आणि वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.दरम्यान जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संग्राम जगताप यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

याबाबत बोलताना संग्राम जगताप म्हणाले, जयंत पाटील अजित पवार गटात आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचं स्वागतच करतील, जयंत पाटील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नसताना अनेक वेळा त्यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. जयंत पाटील हे राजकीय दृष्ट्या अस्वस्थ आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसापासून जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र राजीनाम्यानंतर या पदासाठी रोहित पवार,राजेश टोपे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांची नावे आघाडीवर होती. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीन धक्का तंत्र वापरत प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदे यांचे नाव पुढे आणलं आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली होती, राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. मात्र जयंत पाटील हे शरद पवारांसोबत राहिले. अनेकदा जयंत पाटील हे भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा देखील रंगली.मात्र जयंत पाटील यांनी प्रत्येकवेळी या चर्चेचं खंडण केलं. अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
