गणेशोत्सवाआधी पुण्यातील ढोल-ताशा पथकांसाठी मोठी बातमी! पोलिसांनी घेतला महत्वाचा निर्णय….


पुणे : ढोल-ताशा पथकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यात या वर्षी कोणत्याही ढोल-ताशा वाजवणाऱ्या पथकांवर खटले दाखल केले जाणार नाहीत, असा मोठा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. दरवर्षी निनादाचे उल्लंघन, वेळोवेळी हाणामाऱ्या किंवा परवानगीशिवाय सराव यावरून तक्रारी होत असत.

मात्र यंदा पारंपरिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी पोलिसांचा सकारात्मक पवित्रा पाहायला मिळत आहे. ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने पुण्यातील विविध ढोल-ताशा पथकांचा प्रातिनिधिक वाद्यपूजन सोहळा नुकताच ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात पार पडला.

याच कार्यक्रमात पुणे पोलिसांनी आपल्या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे शहरातील ढोल-ताशा वादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, पारंपरिक वाद्यसंस्कृतीचा सन्मान राखण्यासाठी कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, मात्र सरावाचे ठरलेले नियम पाळणे बंधनकारक असेल. रात्री १० वाजेपर्यंतच सराव परवानगीच्या मर्यादेत असावा, अन्यथा तक्रारीवर कारवाई केली जाईल.

दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी ढोल-ताशा पथकांनी वेळेचे पालन करावे आणि सराव ठिकाणांची माहिती पोलिसांना दिली जावी, अशी विनंती केली आहे. यामुळे उत्सवातील पारंपरिक वाद्यांचा गजर जपून ठेवता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक केंद्र मानलं जातं आणि येथे ढोल-ताशा पथकांची मोठी परंपरा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये परवानगी, ध्वनीप्रदूषण, आणि इतर कारणांवरून काही पथकांवर गुन्हे दाखल झाले होते. यामुळे कलाकारांमध्ये नाराजी होती. मात्र यंदा पुणे पोलिसांचा निर्णय उत्सवप्रिय वातावरणात सकारात्मक बदल घडवणारा ठरतोय.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!