शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आज जाहीर होणार कर्जमाफीची दुसरी लाभार्थी यादी


मुंबई : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत आज दुसरी लाभार्थी यादी जाहीर होणार आहे. या टप्प्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 61 हजार 900 पात्र शेतकऱ्यांना 523 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, लाभार्थ्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

आज जाहीर होणार पात्र शेतकऱ्यांची यादी

दोन लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर केली जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. या यादीतील 61 हजार 900 शेतकऱ्यांना एकूण 523 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. तसेच निवडक लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते कर्जमाफी लाभपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांच्या याद्याही टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जाणार आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पात्र लाभार्थ्यांची यादी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

आधार प्रमाणीकरणानंतर मिळणार लाभ

पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार आहेत. तसेच लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्वतंत्र ओळख क्रमांक दिला जाणार असून, त्या क्रमांकाच्या किंवा आधार क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण अनिवार्य असेल. राज्यभरातील सुमारे 32 हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रां’वर ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असून, तिची प्रभावी व वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी सहकार विभाग युद्धपातळीवर काम करत असल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!