मोठी बातमी! दीनानाथ रुग्णालय तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डॉ. घैसास यांचा राजीनामा..

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली होती, चौकशी अहवालातून देखील रुग्णालयावरच ठपका ठेवण्यात आला आहे, त्यानंतर आता डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला.
सुश्रुत भिसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी मोठा वाद झाल्यानंतर आता डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन आज संध्याकाळी पाच वाजता पत्रकर परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पण त्याआधीच तनिषाच्या मृत्यूला जबाबदार मानले जाणाऱ्या डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला आहे. डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. या प्रकरणात आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्राथमिक निष्कर्षानंतर आता सविस्तर चौकशी अहवाल दोन ते तीन दिवसांत शासनाकडे सादर केला जाणार आहे. गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य शासनाने चौकशी समिती नेमली असून, यासंदर्भात गंभीर आरोप समोर आले आहेत. तनिषा भिसे या २८ मार्च रोजी उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांना दाखवले होते.
डॉ. घैसास यांनी ही प्रसूती जोखमीची असल्याने तनिषाला तातडीने भरती होण्याचा सल्ला दिला. मात्र, भरतीसाठी १० लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागेल, अशी अट घालण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. नातेवाइकांनी २ ते ३ लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली, तरीही रुग्णालयाने तनिषाला भरती करून घेतले नाही, असा आरोप तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून कऱण्यात आला.