मोठी बातमी! शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला; प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी पुण्यात हलवलं!

बीड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर नगर-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात खाडे आणि त्यांचे तीन सहकारी गंभीर जखमी झाले असुन खाडे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना अहिल्यानगरच्या खाजगी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर रात्रीच्या वेळी 10 ते 15 अज्ञात हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल आणि सत्तूरचा वापर करत राम खाडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला. खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी हा हल्ला राजकीय वैमनस्यातून आणि खाडे यांनी उघडकीस आणलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींमुळे घडवून आणल्याचा आरोप केला आहे.शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे राम खाडे हे सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अहिल्यानगरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची तब्येत अधिक बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवण्याचा सल्ला दिला. हा हल्ला नगर-सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ झाला.
दरम्यान, सर्व जखमींना तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार देण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात नेण्यात आला आहे. घटनास्थळाचे व्हिडिओ फुटेज तपासले असता, तिथे सत्तूर असल्याचे दिसून आले आहे. हे हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी हा हल्ला का केला, याचा तपास पोलीस करत आहेत.
