मोठी बातमी! नाशिकमध्ये मोठा राडा, 31 पोलीस जखमी, मध्यरात्री काय घडलं? अनधिकृत दर्ग्याच तोडकाम सुरु अन्..

नाशिक : नाशिकमध्ये रात्री मोठा गोंधळ बघायला मिळाला. अनधिकृत दर्ग्याच्या याठिकाणी झालेल्या दगडफेकीत 31 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दगडफेक करणाऱ्या 15 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनेक संशयास्पद मोटरसायकली पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे मोठा गोंधळ उडाला.
याबाबत माहिती अशी की, नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्ग्याच्या तोडकामाला पहाटेपासून सुरुवात झाली आहे. मात्र हे अनधिकृत बांधकाम तोडण्याआधी रात्रीच्यावेळी तिथे हिंसाचार झाला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामुळे अनेकजण जखमी झाले.
याठिकाणी बांधकाम काढण्यासाठी पथक आलं होतं. मात्र यावेळी एका जमावाने विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांना समजावण्यासाठी दर्ग्याचे ट्रस्टी, प्रतिष्ठित नागरिक आले होते. मात्र त्यांनाही जुमानलं नाही. प्रतिष्ठित नागरिक आणि पोलिसांवर दगडफेक केली. काही गाड्याच नुकसान केलं. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. सध्या परिस्थिती शांत आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली. रात्रीच्या वेळी 500 पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, जमाव 400 च्या वर होता. पालिकेने न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत दर्ग्याला 1 एप्रिलला नोटीस बजावली होती. स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा तोडकामाचा इशारा दिला होता. मात्र तसे झाले नाही.
नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गतही बदल केला आहे. वीजपुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावाने दगडफेक केली. वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडल्यानं तणाव निर्माण झाला होता. यामुळे याठिकाणी अजूनही पोलीस आहेत. याबाबत परिस्थिती कोणी बिघडवत असेल तर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.