मोठी बातमी! स्वारगेट -कात्रज मेट्रो मार्गावर दोन स्थानकांना मंजुरी ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

पुणे: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुणे मेट्रोमुळे प्रवाशांना मोठा फायदा झाला आहे. आता याच मेट्रोसेवेबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या पाच किलोमीटरच्या मेट्रो मार्गावर आणखी दोन स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे.त्यानुसार पुणे मेट्रोच्या टप्पा – 1 अंतर्गत स्वारगेट – कात्रज मार्गावर बिबवेवाडी आणि बालाजीनगर येथे दोन नवीन स्थानके होणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीनं महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये पुणे मेट्रोच्या टप्पा-1 अंतर्गत स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे, ही पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या पाच किलोमीटरच्या मेट्रो मार्गावर पूर्वीच तीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली होती. यात मार्केट यार्ड, पद्मावती व कात्रज या स्थानकांचा समावेश होता. मात्र, बालाजीनगर येथे स्थानक व्हावे, अशी स्थानिकांची मागणी होती. तसा प्रस्ताव देखील देण्यात आला होता. अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.