नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक? सुरक्षा व्यवस्थेत घुसखोरीचा प्रयत्न, दोघे ताब्यात

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबई दौऱ्यावर येणार असून, बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र, याच ठिकाणी दोन संशयित आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली.
सुरक्षा तपासणीदरम्यान दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. त्यानंतर दोघांना तातडीने ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी एका व्यक्तीचे नाव रोहन पारेख असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यासोबत असलेल्या बॉडीगार्डकडे बंदूक आढळल्याचे सांगण्यात येत आहे.

स्वतःला PMO अधिकारी असल्याचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय रोहन पारेख याने सुरुवातीला स्वतःची ओळख पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी म्हणून करून दिली. मात्र, सुरक्षा तपासणीदरम्यान त्याच्याकडे असलेले PMO कार्यालयाचे ओळखपत्र तपासण्यात आले.


हे ओळखपत्र बनावट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत रोहनसह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले.
बंदूक आणि बनावट ओळखपत्रामुळे संशय वाढला
रोहनसोबत असलेल्या बॉडीगार्डकडे बंदूक आढळल्याने सुरक्षा यंत्रणांचा संशय अधिकच बळावला. बनावट ओळखपत्राचा वापर करून आणि शस्त्रासह कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दोघांची चौकशी करण्यात येत असून, त्यांच्या पार्श्वभूमीची तसेच कार्यक्रमस्थळी येण्यामागील कारणांची माहिती घेतली जात आहे.
व्हीव्हीआयपी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पंतप्रधानांना एसपीजीसह कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना बनावट ओळखपत्र आणि बंदुकीसह संशयित व्यक्ती कार्यक्रमस्थळापर्यंत कशा पोहोचल्या, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून सुरू असल्याची माहिती आहे. संशयितांचा नेमका उद्देश काय होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता केला जात आहे.