खासदारांच्या पगार, पेन्शनमध्ये मोठी वाढ! केंद्र सरकारचे गिफ्ट, जाणून घ्या किती मिळणार वेतन?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने खासदारांच्या मानधनाबाबत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने खासदारांच्या पगार, दैनिक भत्ता आणि पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे.
महागाईच्या पार्श्वभूमीवर ही वाढ केल्याची माहिती अधिकृत अधिसूचनेतून देण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, खासदारांच्या पगारात आता लक्षणीय वाढ झाली आहे.
याआधी त्यांना दरमहा १,००,००० रुपये वेतन मिळत होते. आता हा आकडा वाढवून १,२४,००० रुपये प्रति महिना करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, प्रतिदिन मिळणारा भत्ता २,००० रुपयांवरून २,५०० रुपये करण्यात आला आहे.
निवृत्त खासदारांसाठी देखील पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी त्यांना मासिक पेन्शन २५,००० रुपये मिळत होते, जे आता वाढवून ३१, ००० रुपये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ज्यांनी ५ वर्षांहून अधिक सेवा केली आहे, अशा माजी खासदारांना मिळणाऱ्या अतिरिक्त पेन्शनमध्येही वाढ झाली असून, ती २,००० रुपयांवरून २,५०० रुपये करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांतील वाढती महागाई लक्षात घेऊन ही पगारवाढ करण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या वाढीसाठी रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या खर्च निर्देशांकाचा आधार घेतला गेला आहे. परिणामी, ही सुधारणा सध्या काम करत असलेल्या आणि निवृत्त खासदारांना लागू होणार आहे.
दरम्यान, कर्नाटक विधानमंडळाने मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांच्या वेतनात १०० टक्के वाढ केली होती. त्यानंतर लगेचच केंद्र सरकारनेही खासदारांसाठी ही घोषणा केली आहे. कर्नाटकात हा निर्णय ‘कर्नाटक मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते (सुधारणा) विधेयक २०२५’ आणि ‘कर्नाटक विधानसभेच्या सदस्यांचे वेतन, निवृत्ती वेतन आणि भत्ते विधेयक २०२५’ अंतर्गत घेण्यात आला.