केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; तब्बल 9 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द!

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील तब्बल 334 नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी कायमची रद्द केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील ज्या पक्षांची मान्यता रद्द झाली आहे, त्यामध्ये अवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद, इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी, नवबहुजन समाजपरिवर्तन पार्टी, पीपल्स गार्डियन, द लोक पार्टी ऑफ इंडिया आणि युवा शक्ती संघटना यांचा समावेश आहे. या पक्षांना आता लोकप्रतिनिधी कायदा आणि संबंधित कायद्यांनुसार कोणतेही निवडणूक लाभ मिळणार नाहीत. यामध्ये निवडणूक चिन्हांचा वापर, आयकर सवलती आणि प्रचारासाठी मिळणाऱ्या विशेष सुविधांचा समावेश आहे.
सध्या देशात 6 राष्ट्रीय पक्ष,67 प्रादेशिक पक्ष,2854 नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष आहेत. लोकप्रतिनिधत्व कायदा 1951 कलम 29 अंतर्गत नोंदणी करताना पक्षाने नाव, पत्ता,पदाधिकारी यांची माहिती द्यावी लागते तसेच सहा वर्ष सलग निवडणूक न लढवल्यास नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाकडे आहे.