मनसेला मोठा धक्का ; कोकणातील बडा नेता शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार

पुणे : आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच आता रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे प्रमुख नेते वैभव खेडेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वैभव खेडेकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कोकणात भाजपाची ताकद वाढणार आहे.

आगामी निवडणुकासाठी भाजपने मोठी खेळी खेळत मनसेला धक्का दिला आहे.कोकणातील बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश झाला तर कोकणातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसे नेते वैभव खेडेकर हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. काल दुपारी ४ वाजता खेडेकर आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यानंतर रात्री खेड येथे मुक्काम करून आज सकाळी सर्व पदाधिकाऱ्यांसह ते मुंबई गाठतील. यानंतर भाजप कार्यालयात हा सोहळा पार पडणार आहे.यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.तसेच, मंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे देखील या सोहळ्याला हजर राहण्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान वैभव खेडेकर यांच्यासोबत मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी शहरातील काही प्रमुख पदाधिकारी आणि वाहतूक सेनेचे पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अलीकडेच मनसेने वैभव खेडेकर यांच्यासह तीन जिल्हाध्यक्ष पदावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता भाजपात प्रवेश केल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे.
