‘पीएमपी ‘चा मोठा दणका ; बस बंद पडल्यास चालक अन संबंधित अभियंत्याचा अर्ध्या दिवसाचा पगार कट….

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने चालकांसह संबंधित अभियंत्याला चांगलाच दणका दिला आहे. महामंडळाच्या स्वमालकीच्या बस रस्त्यात बंद पडल्यास संबंधित देखभाल दुरुस्ती अभियंता आणि चालक यांच्यावर आर्थिक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, बस बंद पडल्यास दोघांच्या पगारातून अर्ध्या दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे.
पीएमपी महामंडळाने अर्ध्या दिवसाच्या पगार कपातीचा घेतलेला निर्णय हा फक्त पीएमपीच्या मालकीच्या बससाठी लागू असुन कंत्राटी पद्धतीवरील बसेसना त्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून, या निर्णयावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.सध्या पीएमटीकडे एकूण १,९८३ बसचा ताफा आहे. त्यात ९६४ स्वमालकीच्या आणि १,०१९ कंत्राटी बसचा समावेश आहे. यापैकी स्वमालकीच्या ७३७ बस विविध आगारांमध्ये दुरुस्ती प्रक्रियेत आहेत. तांत्रिक बिघाड, अचानक ब्रेकडाऊन किंवा अन्य कारणांमुळे काही फेऱ्या रद्द होत असून, त्याचा परिणाम पीएपीच्या उत्पन्नावर होत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना चांगली सेवा मिळावी म्हणून ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान महामंडळाच्या अध्यक्षांनी असा आदेश दिला आहे की, बस मार्गावर पाठवण्यापूर्वी विभागीय देखभाल दुरुस्ती अभियंत्यांनी दुरुस्ती पूर्ण झाल्याची खात्री करावी. तसेच, चालकानेही तपासणी करूनच बस मार्गावर न्यावी. मात्र, संचलनादरम्यान बस बंद पडल्यास, अभियंता आणि चालक या दोघांच्या वेतनातून अर्ध्या दिवसाचे वेतन कपात केले जाईल. त्यांच्या या निर्णयाचा चालकांना चांगलाच फटका बसणार आहे.