कोल्हापुरात आयकर विभागाची मोठी कारवाई ; बड्या उद्योजकाच्या आलिशान बंगल्यावर अन् कारखान्यावर छापेमारी, सापडलं मोठं घबाड?

पुणे : कोल्हापुरातील आयकर विभागाने बुधवारी सकाळी सात वाजता न्यू पॅलेस परिसरातील उद्योग समूहाच्या संचालकाच्या निवासस्थानावर व कागल एमआयडीसी येथील कारखान्यावर व ऑफिसवर छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत कोल्हापूर आयकर विभागातील 50 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत.काल (8 ऑक्टोबर) सकाळपासून सुरु झालेली कारवाई आज (9 ऑक्टोबर) सकाळपासून सुरुच असून पोलिस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. स्टील उद्योग कंपनीच्या निगडीत संचालकांवरही छापेमारी करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात आयकर विभागाने अनुप बन्सल नामक उद्योगपतीच्या घरावरही छापेमारी केली आहे. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील स्टील उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर तसेच कोल्हापुरातील निवासस्थानाचा सुद्धा समावेश आहे. गोव्यात या उद्योजकाचे मुख्य युनिट असून ते कोल्हापूरचे आहेत. गोव्यात आयकर विभागाने कारवाई केल्यानंतर कोल्हापूरमधील स्थानिक आयकर विभागाकडून उद्योजकाच्या आलिशान घराची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईनंतर उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे.
आयकर विभागाकडून संबंधित उद्योग समूहाच्या गेल्या सहा वर्षातील विविध खात्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. उद्योग समूहाने घर, जमीन, शेअर्स तसेच सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर उद्योग समूहाची विविध कागदपत्रे सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहेत.दुसरीकडे, याच उद्योजकाने दसऱ्यालाच आलिशान कार खरेदी केली आहे. या कारची किंमत दीड ते पावणे दोन कोटींच्या घरात असल्याचे समजते. या गाडीला अजूनही नंबर मिळालेला नाही. त्याचीही माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. आयकर विभागाच्या या कारवाईने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे