संभाजी भिडेंचा शिवस्मारकाला विरोध, म्हणाले, कोट्यवधी रुपये खर्चून स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नये….!

पुणे : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील जुन्नरमध्ये गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांनी सहभाग घेतला आहे.
यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे, ते म्हणाले, राज्यात नको इतके पुतळे आहेत. आता अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं जात आहे. त्या स्मारकाचा आणि छत्रपती शिवरायांच्या आयुष्याचा काहीच संबंध नाही.
त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून हे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नये. तसेच आमच्या छत्रपती शिवरायांना इंग्लंडच्या प्रसुतीगृहातून बाहेर काढा. त्यांची जयंती भारतीय हिंदू पंचांगानुसारच झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले आहे.
यामुळे आता याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, संभाजी भिडे हे कायम त्यांच्या रोखठोक भूमिकांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या आक्षेपार्ह विधानांमुळे ते कायमच वादाच्या भोवऱ्यात देखील सापडतात.
आता भिडे गुरुजी यांनी थेट सरकारच्या भूमिकेलाच आव्हान दिल्यामुळे नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. आता यावर भाजपची काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.