पुणे अन् पिंपरी-चिंचवडमध्ये ‘भारत टॅक्सी’ची एन्ट्री! ओला-उबरला टक्कर, पाहा नवे दर

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. चालकांच्या मालकीची आणि सहकारी तत्त्वावर आधारित ‘भारत टॅक्सी’ सेवा आता अधिकृतपणे सुरू झाली आहे.
या सेवेमुळे प्रवाशांना निश्चित भाड्यात प्रवास करता येणार असून, गर्दीच्या किंवा पावसाळ्यातील काळात वाढणाऱ्या कॅबच्या भाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या ॲप-आधारित कॅब सेवांच्या तुलनेत ‘भारत टॅक्सी’ हा नवा पर्याय पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना उपलब्ध झाला आहे. चाचणी टप्पा यशस्वी झाल्यानंतर ही सेवा ॲपद्वारे सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मॉडेलमध्ये चालकांकडून कमिशन आकारले जाणार नसल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे.


या सेवेसाठी आतापर्यंत सुमारे 35 हजार चालकांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करून आणि चालक संघटनांशी चर्चा केल्यानंतर भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत.
सर्ज प्राइसिंग नाही; गर्दीच्या वेळी फक्त 10% अतिरिक्त शुल्क
इतर ॲप-आधारित कॅब सेवांप्रमाणे सर्ज प्राइसिंग लागू केले जाणार नाही. दिवसभर निश्चित दर आकारले जातील. मात्र सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत मूळ भाड्यावर 10 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
पुण्यातील ‘भारत टॅक्सी’चे दर
ऑटो-रिक्षा : ₹18 प्रति किमी
मोटारसायकल : ₹24 प्रति किमी
सेडान कॅब : ₹25 प्रति किमी
एसयूव्ही : ₹32 प्रति किमी
पुणे-मुंबई प्रवासासाठीही निश्चित दर
पुणे-मुंबई आंतरशहरी सेवेसाठी हॅचबॅकचे भाडे ₹21, सेडानचे ₹23 आणि एसयूव्हीचे ₹30 प्रति किलोमीटर निश्चित करण्यात आले आहे.
पुणे विमानतळावर प्रवाशांसाठी विशेष बूथ सुरू करण्याबाबत विमानतळ प्रशासनाशी चर्चा सुरू असून, ही सुविधा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
‘या’ शहरांसाठीही सेवा सुरू करण्याचे नियोजन
यापुढे पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर आणि पुणे-कोल्हापूर या मार्गांवरही आंतरशहरी ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खासगी कॅब कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या वाढीव भाड्याला ही सेवा पर्याय ठरू शकते.
निश्चित भाडे आणि चालकांच्या मालकीची रचना यामुळे प्रवाशांना अधिक पारदर्शक आणि परवडणारी सेवा मिळेल, असा दावा संबंधितांकडून करण्यात आला आहे.