साखर कारखान्यांचे दिवस पालटणार! फडणवीस सरकारचा पुनरुज्जीवनासाठी मास्टर प्लॅन; १३ सदस्यीय समिती स्थापन

मुंबई : महाराष्ट्रातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सहकारी साखर कारखान्यांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने १३ सदस्यीय समिती स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.
साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची सद्यस्थिती, आर्थिक अडचणी आणि कारखाने बंद पडण्यामागील कारणांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. सहकार विभाग आणि राज्य सहकारी बँकेच्या संयुक्त सहभागातून हा अभ्यास होणार आहे.

आर्थिक सक्षमीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

या समितीमध्ये सहकार आयुक्त, राज्य सहकारी बँक, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तसेच सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

ऊस उत्पादकता आणि साखर उतारा वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत समिती शिफारशी करणार आहे. ऊस शेतीमध्ये एआय, जीपीएस, ड्रोन आणि ठिबक सिंचनाचा वापर वाढवण्यासह मृदा आरोग्य, ऊस बियाणे आणि पीक फेरपालट यांचाही अभ्यास केला जाणार आहे.
साखर उद्योगातून उत्पन्नाचे नवे मार्ग शोधणार
साखर कारखान्यांना केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न ठेवता त्यांना ऊर्जा संकुल म्हणून विकसित करण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी इथेनॉल, सीबीजी, सहवीज निर्मिती, सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि जैव-रसायन निर्मितीला प्रोत्साहन देण्याबाबत समिती अभ्यास करणार आहे.
तसेच १० उपपदार्थांची निर्मिती करणारे एकात्मिक बायो-रिफायनरी अर्थात झिरो वेस्ट मॉडेल विकसित करण्याची शक्यता तपासली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारचा २० टक्के, राज्य सरकारचा १० टक्के आणि संबंधित कारखान्यांचा ७० टक्के आर्थिक सहभाग असलेल्या प्रस्तावित प्रारूपाची व्यवहार्यताही तपासली जाईल.
अडचणीतील कारखान्यांसाठी कर्जनिराकरणाचा आराखडा
आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी स्वतंत्र पुनरुज्जीवन आराखडा तयार केला जाणार आहे. प्रत्येक कारखान्याची आर्थिक व्यवहार्यता तपासून हंगामनिहाय कॅश क्रेडिट कर्ज खाते आणि कर्ज परतफेडीचे धोरण निश्चित करण्याचा अभ्यास होईल.
एनपीए झालेल्या कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी रिझर्व्ह बँकेच्या मदतीने कर्जनिराकरण आराखडा तयार करण्याचाही विचार आहे. याशिवाय बाह्य गुंतवणूकदारांचा सहभाग, पुनरुज्जीवन निधी आणि एनसीडीसीमार्फत भांडवली सहाय्य याबाबतही धोरणात्मक शिफारशी केल्या जाणार आहेत.
दोन महिन्यांत सरकारला अहवाल सादर करणार
या समितीला दोन महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल आणि आवश्यक शिफारशी राज्य सरकारकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे समितीच्या अहवालानंतर राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.
