लाडक्या बहिणींना राज्य सरकारचा दणका, आता घरोघरी होणार पडताळणी, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने घेतला निर्णय..

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
अशातच आता बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर सध्या संशयाची सावली पडली आहे. योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींमुळे आता सरकारकडून घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
विशेषतः जालना जिल्ह्यातील ७० हजार महिलांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे.या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये अनुदान दिले जाते.
दरम्यान, ही योजना सुरू झाल्यानंतर लाखो महिलांना लाभ मिळाला, मात्र याच योजनेचा गैरफायदा काही पुरुष व सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत.
जालना जिल्ह्यात एकाच घरातील दोनपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारींची संख्या वाढत असल्याने शासनाने ७० हजार लाभार्थींची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत थेट लाभार्थींच्या घरी जाऊन पात्रता तपासली जाणार आहे. चुकीचे लाभ घेणाऱ्यांची नावे थेट योजनेतून वगळली जातील.
या योजनेच्या प्रारंभिक टप्प्यात अर्ज करताना फारसे निकष तपासले गेले नाहीत, त्यामुळे अर्जदारांची पात्रता नीट न पडताळता मंजुरी देण्यात आली होती. याचाच गैरफायदा घेत राज्यात १४,००० हून अधिक पुरुषांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
या पुरुषांना तब्बल १० महिन्यांपर्यंत दरमहा १५०० रुपये मिळाले असून, त्यातून २१ कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच २,००० हून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचे पैसे घेतल्याचे उघड झाले आहे. राज्यातील १.६० लाखाहून अधिक कर्मचारी (पुरुष व महिला) यांची पडताळणी केल्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला.