Baramati News : दुष्काळी गाव पण एकाच दिवशी अनेक शेतकऱ्यांनी घेतल्या इलेक्ट्रॉनिक दुचाकी, बारामती तालुक्यात रंगली चर्चा, नेमकं कारण काय?

Baramati News : बारामती तालुक्यातील बोरकरवाडी गावाची आज तालुक्यात चर्चा होत आहे. आज इथले अकरा शेतकरी एकदम चर्चेत आले ज्याची तालुक्यात चर्चा होत आहे. बोरकरवाडी गावातील ११ शेतकऱ्यांनी बुकिंग केलेली इलेक्ट्रॉनिक दुचाकी ताब्यात घेतली.

बोरकरवाडी (ता. बारामती) हे तसे दुष्काळी गाव. बारामतीच्या जिरायती पट्ट्यातील गावांमध्ये बोरकरवाडीचा समावेश होतो. इथल्या शेतकऱ्यांनी कष्टातून येथील शेती फुलवली खरी, पण त्यांनाही दुष्काळी परिस्थिती सामना करावा लागतो.
शेतीच्या शेतमालाच्या भावातील तीव्र चढउतार, लहरी हवामान आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करताना इथले देखील शेतकरी मेटाकूटीला आले आहेत. मात्र, आज इथले अकरा शेतकरी एकदम चर्चेत आले. Baramati News

खरंतर एकाच दिवशी अनेक शेतकऱ्यांनी काही वाहने घेणे हा काही तसा नवीन प्रकार नाही, मात्र आज बारामती तालुक्यातील या बोरकरवाडी गावातील ११ शेतकऱ्यांनी बुकिंग केलेली इलेक्ट्रॉनिक दुचाकी ताब्यात घेतली.
संतोष नानासो बोरकर, रमेश नामदेव बोरकर, आकाश आनंदा बडदे, तानाजी भागुजी बोरकर, शुभम शंकर बोरकर, नंदकुमार उत्तम कदम, मयुर मधुकर बोरकर, संतोष नारायण बोरकर, विजय भाऊसो बोरकर, शरद मारुती बोरकर, अमित चंद्रकांत बोरकर या ११ शेतकऱ्यांनी तब्बल १५लाख रुपये खर्चून या दुचाकी आज खरेदी केल्यात.
या शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर नव्हताच, परंतु या शेतकऱ्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली, ती मात्र विचार करण्यासारखी आहे. या शेतकऱ्यांनी सांगितले की, पेट्रोलचे वाढते दर, डिझेलचे वाढते दर याचा मोठा परिणाम शेती आणि शेतकऱ्यांवर होऊ लागला आहे.
त्यामुळे पेट्रोलच्या दुचाक्या आता परवडत नाहीत. शेतकरी म्हटले की, अघळपगळपणा जरा आलाच, त्यामुळे एखाद्या कामासाठी गेल्यानंतर त्यापेक्षा जास्त फिरणे होते, अशावेळी अंदाजे गृहीत धरलेल्या पेट्रोल पेक्षा जास्त खर्च होतो. यावर उपाय म्हणून आम्ही सर्वांनी इलेक्ट्रॉनिक गाड्या घेण्याचा निर्णय घेतला.
अर्थात एरवी शेतमालाला अधिक भाव मिळाला म्हणून शेतकऱ्यांनी आलिशान वाहने घेतली, हे आपण बऱ्याचदा अनुभवले, परंतु अशी कोणतीही परिस्थिती नसताना, घेतलेली नवीन वाहने एका वेगळ्याच कारणासाठी घेतलेली आहेत आणि ते म्हणजे काटकसर आणि खर्च कमी करण्यासाठी! हे ऐकल्यावर मात्र या नवीन खरेदीची चर्चा अधिक झाली. बारामती तालुक्यात या ११ शेतकऱ्यांची चर्चा होताना दिसत आहे.