Baramati Lok sabha : बारामतीत अजित पवारच लढणार लोकसभा निवडणुक? अर्जही घेतला, महत्वाची माहिती समोर…
Baramati Lok sabha : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या रंजक घडामोडी सुरु आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरल्या आहेत.
नणंद विरुद्ध भावजय या संघर्षाकडे राज्याचं लक्ष लागले आहे. पण बारामतीत भाऊ विरुद्ध बहीण असाही संघर्ष होऊ शकतो. अजित पवारांच्या नावानं बारामतीमधून उमेदवारी अर्ज भरण्याच येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
बारामतीमधून सुनेत्रा पवार १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून त्यांच्या नावे अर्ज घेण्यात आला आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावेही अर्ज घेण्यात आला आहे. Baramati Lok sabha
तसेच या घडामोडी पाहता बारामतीमध्ये अजित पवार डमी उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुनेत्रा पवार यांचा अर्ज काही कारणांमुळे बाद झाल्यास उमेदवारीबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशावेळी अजित पवार यांच्याकडून अर्ज भरला जाऊ शकतो.
बारामतीची निवडणूक अजित पवार आणि शरद पवार गटासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे महायुतीकडून विशेष काळजी घेतली जात आहे. अजित पवारांच्या नावानं घेण्यात आलेला अर्ज त्याच खबरदारीचा भाग आहे.
केव्हा दिला जातो डमी उमेदवार?
महत्त्वाच्या जागांवर उमेदवारी अर्ज भरताना राजकीय पक्ष खबरदारीचा उपाय म्हणून डमी उमेदवारी अर्ज भरुन ठेवतात. काही कारणानं मुख्य उमेदवाराचा अर्ज पडताळणीत बाद ठरल्यास त्या जागेवर पक्षाकडून उमेदवारच नाही अशी परिस्थिती ओढावू नये यासाठी डमी उमेदवाराचा अर्ज भरला जातो.
प्रतिष्ठेची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये डमी उमेदवार वापरला जातो. डमी उमेदवार मुख्य उमेदवाराच्या तोडीसतोड असतो. मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यास डमी उमेदवाराला निवडणूक लढवावी लागते. त्यामुळे डमी उमेदवार विजयाची खात्री असणारा असावा लागतो.