बँकॉक ते मुंबई… ‘सोन्याचा गुप्त मार्ग’ अखेर उघड; DRI च्या धडक कारवाईत ५ कोटींचं सोनं जप्त, ७ जण अटकेत

मुंबई : मुंबई विमानतळाचा वापर करून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा संचालनालय महसूल गुप्तचर (DRI) विभागाने पर्दाफाश केला आहे. ‘ऑपरेशन गोल्डन नेक्सस’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत सुमारे ५ कोटी रुपये किमतीचे ३.२ किलो परदेशी सोनं जप्त करण्यात आले असून या प्रकरणात परदेशी नागरिक, विमानतळ कर्मचारी आणि स्थानिक एजंट अशा एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मुंबईमार्गे सुरू असलेल्या तस्करीच्या आंतरराष्ट्रीय साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

डीआरआयला काही दिवसांपासून मुंबई विमानतळावरून सोन्याची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी संशयितांवर गुप्त पाळत ठेवत तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान बँकॉकहून मुंबईत येणाऱ्या काही परदेशी प्रवाशांकडून अत्यंत चलाखीने सोनं आणले जात असल्याचे समोर आले. हे सोनं पारंपरिक स्वरूपात नसून वॅक्स मिश्रित सोन्याच्या धुळीच्या स्वरूपात शरीरात लपवून भारतात आणले जात होते.
तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतशी या रॅकेटची व्याप्ती अधिक स्पष्ट झाली. विमानतळ परिसरात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे सोनं बाहेर काढून स्थानिक एजंटांकडे पोहोचवले जात असल्याचे उघड झाले. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी आखलेल्या सापळ्यात दोन बस चालक आणि एका कोच मॉनिटरला संशयित सोन्याची डिलिव्हरी करताना पकडण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत संपूर्ण साखळीचा उलगडा झाला.

या कारवाईत ३ बांगलादेशी व श्रीलंकन नागरिक, ३ विमानतळ कर्मचारी आणि १ स्थानिक रिसिव्हर अशा सात जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची बाजारातील किंमत अंदाजे ५ कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित आरोपींविरोधात कस्टम्स कायदा, १९६२ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, ही तस्करी केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून तिचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय नेटवर्कशी जोडलेले असण्याची शक्यता तपास यंत्रणा तपासत आहेत. जप्त केलेले सोनं नेमकं कोणाकडे पोहोचणार होतं, त्यामागील आर्थिक व्यवहार कोण सांभाळत होतं आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे.
डीआरआयच्या या कारवाईमुळे विमानतळाचा वापर करून सुरू असलेल्या सोन्याच्या तस्करीच्या मार्गावर मोठा आघात झाला असून, आगामी काळात अशा नेटवर्कविरोधात आणखी कठोर कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.