Baba Ramdev : अखेर बाबा रामदेव यांनी मागितली सुप्रीम कोर्टासमोर माफी, पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर माफीनामा…

Baba Ramdev : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींशी संबंधित अवमानना खटल्याच्या सुनावणीसाठी योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण आज मंगळवारी (ता.१५) सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. तसेच १९ मार्च रोजी न्यायालयाने बाबा रामदेव यांना सुनावणीवेळी प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले होते.

त्यानुसार, ते आज सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. दरम्यान, पतंजलीच्या औषधी उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी न्यायालयासमोर बिनशर्त माफी मागितली.
पतंजलीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी यावेळी सांगितले की , ते (बाबा रामदेव) माफी मागण्यासाठी येथे वैयक्तिकरित्या उपस्थित आहेत, असे पतंजलीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यांची न्यायालयातील उपस्थिती आणि बिनशर्त माफीची दखल घ्यावी, अशी विनंती बाबा रामदेव यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. Baba Ramdev

दरम्यान, जे घडले ते घडायला नको होते, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पतंजलीच्या ‘दिशाभूल करणाऱ्या’ जाहिरात प्रकरणाच्या सुनावणीवेळी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्याविरुद्ध खोटी साक्ष दिल्याबद्दल खटला चालवावा असे म्हणत दोघांना आठवडाभरात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी मुदत दिली. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार असून सुनावणीच्या पुढील तारखेला प्रतिवादी उपस्थित राहतील, असेही न्यायालयाने सांगितले.
यापूर्वी अवमानना नोटीस बजावली…
पतंजली आयुर्वेदने औषधी उपचारांबद्दल दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करणे सुरू ठेवल्याने न्यायालयाने यापूर्वी त्यांना अवमानना नोटीस बजावली होती. पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याविरुद्धच्या अवमानना कारवाईत कारणे दाखवा नोटीसला उत्तर न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दोघांना वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.