प्रक्षोभक भाषण प्रकरणी आझम खान दोषी; लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगींवर केली होती टीका…

लखनऊ : समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आझम खान यांना २०१९ च्या एका प्रक्षोभक भाषण प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले असून शनिवारी रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
आझम खान यांच्यावर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शहजाद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील धामोरा येथे द्वेषपूर्ण भाषण दिल्याचा आरोप आहे. आझम यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तत्कालीन रामपूर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य करत प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे.
आझम खान यांना प्रक्षोभक भाषण प्रकरणात २ वर्षांचा तुरुंगवास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. साक्षीदार आणि पुरावे पाहून आझम खान यांना कोर्टात दोषी ठरवण्यात आले आहे.
दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आझम खान यांच्यावर द्वेषपूर्ण भाषणाचे हे दुसरे प्रकरण आहे. पहिल्या प्रकरणात त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी रामपूर येथील एमपी-एमएलए विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती.