कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न; आता २४१० रुपयांनी होणार खरेदी, सरकारचा निर्णय…
नवी दिल्ली : काही दिवसांपासून राज्यात कांद्याचे दर कोसळले असून ,अशातच केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांद्याचे दर आणखी कमी होऊ शकतील.
याच मुद्द्यावरून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कांदा प्रश्नावरून केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली.
त्यावर चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक, अहमदनगर आणि लासलगावसह वेगवेगळ्या केंद्रांवरून २ लाख टन कांदा प्रतिक्विंटल २४१० दराने खरेदी केला जाईल, जर गरज पडली तर २ लाख टनांपेक्षाही जास्त कांदा खरेदी केला जाणार अशी ट्विटरवर घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, धनंजय मुंडे यांची बैठक होण्यापूर्वी फडणवीसांनी कांदा प्रश्नावर तोडगा काढला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात फडणवीस यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादी वर सरशी केल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.