Ashadhi Wari 2024 : लोणीकाळभोरला भक्तीचा महापूर! वैष्णवांचा महामेळा मुक्कामी विसावला..!!


जयदिप जाधव

Ashadhi Wari 2024 उरुळीकांचन : माऊली… माऊली… माऊली… ‘ज्ञानोबा.. तुकाराम’ या नामाचा जयघोष, पालखीच्या पुढे दिंड्या, पाठीमागे तुळशी वृंदावन घेतलेल्या वारकरी महिला, विणेकरी सोबतीला आसमंतांत घुमनारा टाळ – मृदुंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी, अशा या भक्तिमय वातावरणात लाखो वारकऱ्यांसह पुण्याहून निघालेला जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखी स्थळावर मंगळवारी (ता. ०२) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विसावला.

मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील दुपारचा विसावा उरकून, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पोहोचताच, रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नागरिकांनी टाळ्या वाजवून पालखीचे दर्शन तसेच वारकऱ्यांचे स्वागत केले. यावेळी पालखी सोहळ्याचे शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, उपसरपंच नासीर खान पठान, माजी सरपंच गौरी गायकवाड, माजी उपसरपंच देविदास कदम, ह.भ.प. सुरेश काळभोर, हनुमंत काळभोर, नवपरिवर्तन फौंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, कोमल काळभोर, बिना काळभोर, प्रीतम गायकवाड, राजश्री काळभोर, विशाल गुजर, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांनी स्वागत केले.

यावेळी नागरिकांनी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष केला. यावेळी पालख्यांसह कदमवाकवस्ती व लोणी काळभोर येथील नागरिक टोलनाका परिसरापासून कदमवाकवस्ती गावात चालत देखील गेले. तसेच अनेकांनी ‘सेल्फी’ टिपत ही आठवण छायाचित्रात बंदिस्त केली. वाकवस्ती येथे पालखीचे साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष नरसिंग काळभोर, माजी उपसरपंच बाबाराजे काळभोर, देविदास काळभोर, हृषिकेश काळभोर,गौरव काळभोर, मुकुल काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. Ashadhi Wari 2024

शुभेच्छांचा वर्षाव घेत पालखी सोहळा लोणी स्टेशन चौकात सात वाजण्याच्या सुमारास पोहोचताच, पालखीचे स्वागत फटाक्यांची आतिषबाजी करून मोठी उत्साहात करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. लोणी स्टेशन येथील छोटा विसावा संपवून पालखी सोहळा मुक्कामासाठी कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोहचली. यावेळी पालखी स्थळावर सार्वजनिक आरती व पूजा करण्यात आली. त्यानंतर लाखो वैष्णवांचा सोहळा विसावला.

दरम्यान, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व पंचक्रोशीतील नागरिकांनी वैष्णव भक्तांना स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली होती. तर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते, विविध संस्था व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांसाठी चिवडा, बिस्कीट, फळे व फराळाचे पदार्थ वाटप केली. पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्यासाठी विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!