Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयानं दिला अंतरिम जामीन, पण…
Arvind Kejriwal : कथित दारू घोटाळ्यात अटक झालेले व सध्या तिहार तुरंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या अटकेला आणि रिमांडला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला.
अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला आव्हान देणारी त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या पीठाकडे पाठवली आहे. मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २१ मार्च रोजी केजरीवालांना अटक केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करताना असे निरीक्षण नोंदवले की अरविंद केजरीवाल यांनी ९० दिवसांचा तुरुंगवास भोगला आहे आणि ते निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत याची आम्हाला कल्पना आहे.
ईडी प्रकरणात झालेली अटक योग्य की अयोग्य यावर न्यायालयाने निर्णय दिला असून न्यायालयाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याची शिफारस केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतरही केजरीवाल मात्र, अद्याप तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही, कारण त्यांना सीबीआयने देखील अटक केली आहे. Arvind Kejriwal
या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाच्या ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत न्यायालयाने केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते. या याचिकेवर आज न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी केजरिवाल यांना जामीन मंजूर करत हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचे आदेश दिले. सुनावणी होईपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.